बारामती पोलिसांची धडक कारवाई ४७ लाखांचा गांजा जप्त

5

बारामती, २१ सप्टेंबर २०२०: पाटस-बारामती रस्त्यावर बारामती तालुका पोलिसांनी सुमारे ४७ लाख रुपयांच्या गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बारामती तालुका पोलिसांनी ४७ लाख रुपयांचा पकडलेला गांजा ही अलिकडच्या काळात बारामतीतील सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुंगीकारक, औषधीद्रव्य पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी टाकलेल्या धाडीत विजय जालिंदर कणसे  (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) विशाल मनोहर राठोड (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली), निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी अटक केल्याची नावे आहेत. सोमवारी (दि. २०) रात्री पाटस- बारामती रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत हवालदार भानुदास बंडगर यांनी फिर्याद दाखल केली असुन सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांना मिळालेल्या विश्वसनीय माहीतीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे, सहाय्यक फौजदार दिलीप सोनवणे, अनिल ओमासे, खेडकर, लोखंडे, मखरे, मरळे, काळे, नरुटे, राऊत, मदने, कवितके,जाधव, शेख यांनी ही कारवाई केली.

चार इसम हे त्यांच्याकडील अशोक लेलंड कंपनीच्या (एमएच-१०, सीआर-४३२६) मधून गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. उंडवडी गावच्या हद्दील ड्रायव्हर ढाब्याजवळ काही अंतरावर सापळा रचला. काही वेळानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता टेम्पोत गांजाची ११ पोती आढळून आली. पोत्यात खाकी रंगाच्या प्लास्टिक बॅगमध्ये गांजाचे पुडे बांधले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत टेम्पोमध्ये १३६ बंडल ताब्यात घेतले. त्याचे वजन ३१२.८७४ किलोग्रॅम आहे. पोलिसांनी टेम्पोसह ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा