बारामती २९ जानेवारी २०२१ : गोपनीय माहितीवरून बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपयांचा सव्वा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहूल विश्वास थोरात (रा. पानगल्ली, बारामती) याच्या विरोधात गुंगीकारक अौषधी द्रव्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस कर्मचारी बंडू कोठे यांनी याबाबतची फिर्याद दिली. गुरुवारी (दि.२८) रोजी दुपारी साडे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक प्रकाश वाघमारे व कर्मचाऱयांनी या कारवाईत भाग घेतला. पानगल्ली येथे गांजा विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावक यांची कारवाईसाठी परवानगी घेण्यात आली. पंचांसह पोलिस पानगल्लीत छापा टाकण्यासाठी जात असताना पोलिसांची चाहूल लागताच राहूल थोरात हा तेथून पळून जावू लागला. पोलिसांनी त्याला पकडून एनडीपीएस कायद्यानुसार त्याला नोटीस बजावली. गांजा कोठे ठेवला आहे, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता हंड्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गांजा ठेवलेला आढलून आला.
या कारवाईत पोलिसांनी प्लास्टिक पिशवीत भरलेल्या ६२५० रुपये किमतीच्या २५० ग्रॅम वजनाच्या २२ पुड्या जप्त केल्या.तसेच दुसऱया पिशवीतून ५० हजार रुपयांचा दोन किलो गांजा जप्त केला.
न्युज अनकट प्रतिनिधीन – अमोल यादव