बारामती, दि.२२ मे २०२०: कोरोना संसर्गामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली होती. यामध्ये एसटी सेवा देखील संचारबंदीमुळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र आजपासून मध्यम विभागीय कार्यालयाच्या सुचनेप्रमाणे लहान पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवास करतेवेळी शासनाने आखून दिलेल्या कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व सूचनांचे पालन केले जाते आहे.
मार्च महिन्यात केंद्र सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र परिवहन महामंडळाला देखील एसटी बंद ठेवावी लागली होती. सध्या बारामती शहरात कोरोना बाधित रुग्ण नसल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत यामध्ये आज (शुक्रवारी) बारामती एसटी आगाराने जेजुरीच्या ४ फेऱ्या, वालचंदनगरच्या ६ फेऱ्या, भिगवणच्या ७ फेऱ्या , एमआयडीसीच्या ८ फेऱ्या सुरू केल्या आहेत. आगारात प्रवासी गाडीत येण्याआधी वाहकाने प्रवशांच्या हातावर सॅनिटायजर दिल्यावरच त्यांना प्रवेश दिला जातो आहे. तसेच सोशल डिस्टन्स ठेवत प्रवासी उभे राहण्यासाठी गोल रिंगण आखले आहे. आज एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी अगदी तुरळक प्रवासी दिसले कोरोना संसर्गजन्य विषाणू असल्याने गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी नागरिकांनी एस टी कडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
जवळपास दोन महिने बस सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाचे सवलत मूल्यांसाहित १० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले. तसेच सध्या ज्या मार्गावरील गाड्या सुरू आहेत त्यांचे वाहक व चालकांनाच बोलावले जाते आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव