बारामतीकर म्हणतात, ‘आम्ही ८० वर्षाच्या योध्या’सोबत

पुणे: राष्ट्रवादीच्या कळपातून बाहेर पडून भाजप सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अजित पवारांच्या निर्णयामुळे बारामती शहराला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री होऊन देखील बारामतीकरांनी शांत राहणं पसंत केले आहे. प्रकारचा जल्लोष बारामतीत झाला नाही. मात्र एकीकडे बारामतीकरांनी ‘आम्ही ८०वर्षाच्या योध्या सोबत’ आहोत अशी भूमिका घेतली आहे.
अजित पवारांच्या निर्णयामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र शरद पवार यांनाच साथ देण्याची भूमिका घेतल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे.
यावेळी, ‘आम्ही ८० वर्षांच्या योद्ध्या सोबत’ अशा प्रकारचे पोस्टर शहरातील तीन हत्ती चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरीदेखील एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तर, दुसरीकडे दुसरे अजित पवार यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे बारामतीकरांनी मात्र ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे बारामतीत न जल्लोष न दुःख असेच काहीसे वातावरण आहे.

दरम्यान भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बारामती येथे भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया वरती व्हायरल केले आहेत.
राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा असला तरीदेखील भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. बारामती येथील अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा