बारामती : अटकपूर्व जामिन प्रकरणात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना बारामती तालुका पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव व पोलिस शिपाई अजिंक्य कदम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि. १२) रात्री उशीरा कारवाई केली. या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब भीमराव जाधव (वय ५४, मूळ रा. पंढरपूर) व अजिंक्य लहू कदम यांनी ही रक्कम स्विकारली होती. तक्रारदाराच्या भावाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात अटकपूर्व जामिन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी बाळासाहेब जाधव व अजिंक्य कदम यांनी केली होती. यातील ५० हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना रंगेहाथ अटक केली. बारामतीतील नेवसे रस्त्यावर हॉटेल ओमसमोर पैसे स्विकारताना त्यांना पकडण्यात आले.
एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक ज्योती पाटील, सुनील क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक टिळेकर व गणेश भापकर यांनी ही कारवाई केली.
बदली झाल्यानंतरही हाव कायम…
एसीबीने कारवाई केलेल्या बाळासाहेब जाधव यांची गत आठवड्यातच जेजुरी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. शनिवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. परंतु पैशाची हाव कायम राहिल्याने ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.