कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्या: अमित देशमुख

लातूर, दि.१४ मे २०२० : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात स्थिती नियंत्रणात आली असली तरी यापुढे कोविड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी प्रशासन, नगरपरिषद, पोलीस आणि आरोग्य या सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

पालकमंत्री देशमुख यांनी मंगळवारी (दि.१३) रोजी पुन्हा उदगीर शहरातील कोविड १९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या प्रमुखांची झूम अॅपच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.

या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढगे, नप चे मुख्याधिकारी यांच्यासह उदगीरशी संबंधित वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी उदगीर शहरातील ताजी स्थिती जाणून घेतली. उदगीर शहरात एकूण २९ जणांना कोविड १९ ची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. यापैकी सध्या १७ रुग्ण उपचार घेत असून ११ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. शहरातील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत.
यावेळी त्यांनी सर्व यंत्रणेचे अनुभव आणि त्यांच्या असलेल्या अडचणींची माहिती घेतली. त्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासनाने यात लक्ष घालावे असे निर्देश दिले.

उदगीर शहरात पोलिसांवर वाढलेला ताण लक्षात घेता, त्यांच्या मदतीला होमगार्डची सेवा देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा