बीड जिल्हा परिषदेत धनंजय मुंडेंचा डंका

बीड : विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील मोठा धक्का दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची निवड झाली आहे. अधिकृत निकाल १३ तारखेला जाहीर होणार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना,भाजप बंडखोर आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मदत केली. त्यामुळे आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शिवकन्या सिरसाट या अध्यक्ष म्हणून तर बजरंग सोनवणे हे उपाध्यक्ष म्हणून ३२ मते घेऊन विजयी झाले. विरोधी भाजपच्या उमेदवार योगिनी थोरात यांना २१ मते मिळाली आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बीड जिल्हा परिषदमध्ये सत्ता परिवर्तन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या पाच सदस्यांनी भाजपला उघड मदत केली होती. त्यानंतर पाच सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. या सदस्यांनी यावेळी मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर १३ जानेवारी रोजी सुनावणी झाल्यावर अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करावा असे आदेश न्यायालयाने दिले होते
दरम्यान शनिवारी झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस चे २३ ,काँगेसचे ३,शिवसेनेचे ४ आणि भाजपच्या बंडखोर २ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला मदत केली. त्यामुळे शिवकन्या सिरसाट या अध्यक्ष तर बजरंग सोनवणे हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा