बीड : भरधाव वेगातील स्कॉर्पीओ झाडाला धडकुन खड्ड्यात गेल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन तरूण ठार झाले. दि. १ जानेवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बीड शहरापासुन जवळच असलेल्या म्हसोबा फाट्यावर हा अपघात घडला.
या अपघातात अन्य तिघेजण जखमी झाले असुन त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन्ही मयत बीड शहरातील संत नामदेव नगर भागातील रहिवाशी असुन नववर्षाच्या पहाटेची सुरूवातच अपघाताने झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बीड शहरातील संत नामदेव नगर भागातील पंकजकुमार अंधारे, ओंकार डोंगरे यांच्यासह दत्ता लांडगे, बाळु उबाळे, शुभम डरपे हे पाच जण स्कॉर्पीओ क्र.एम.एच.२३ ए.डी.५७९० मधुन रात्री उशीरा जेवन करण्यासाठी म्हसोबा फाट्याच्या पुढे गेले होते. परत येत असतांना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेली त्यांची स्कॉर्पीओ रस्त्याच्या लगत असलेल्या झाडावर आदळली. झाडावर आदळल्यानंतर गाडी बाजुच्या खड्ड्यात जावुन पडली.
या अपघातात पंकजकुमार अंधारे (२५) याचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार डोंगर, दत्ता लांडगे, बाळु उबाळे, शुभम डरपे हे चौघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ओंकारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास औरंगाबादला हलवण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचार सुरू असताना ओंकार डोंगरे (वय १८) याचाही मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच संत नामदेव भागात शोककळा पसरली होती.