मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
पुणे, ६ डिसेंबर २०२२ : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास श्रीपाद सुखटणकर (वय ९३) यांचे मंगळवारी (ता. सहा) निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे गाजलेले नाटक. आज त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
२१ नोव्हेंबर १९३० रोजी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म झाला. सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. म्हापसा येथील ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत असताना त्यांनी पहिल्यांदाच ‘खोडकर बंडू’ या छोट्या नाटुकलीत काम केले. अभिनय येतो म्हणून नव्हे, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची शिक्षा त्यांना केली होती. त्या नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून त्यांनी बक्षीस पटकाविले. त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली.
त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर गोव्यातील प्रख्यात डॉक्टर होते. समाजसेवा म्हणून त्यांनी आरोग्यसेवा केली. त्यांची आईही स्वतंत्र विचारांची होती. सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या नाट्यक्षेत्रातील कारकिर्दीस सुरवात केली. सुखटणकर यांना रंगकर्मी म्हणून घडविण्यात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे मोठे योगदान राहिले आहे. या संस्थेत त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी ‘कार्यकर्ता’ म्हणून भूमिका निभावली.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, अशा गाजलेल्या नाटकांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारली होती. तर ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या काही मराठी मालिका. मात्र, ते मालिकांमध्ये फारसे रमले नाहीत. त्यांनी नेहमीच रंगभूमीला प्राधान्य दिले. ४० हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील