बंगाल : शिक्षक भरती घोटाळ्यात ‘ईडी’ची मोठी कारवाई; टीएमसी नेत्याच्या घरावर सर्च ऑपरेशन सुरू

बंगाल, २० जानेवारी २०२३ : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते कुंतल घोष यांच्या घरावर ‘ईडी’ने छापा टाकला. ईडी सध्या घोष यांच्या हुगळी येथील घराची चौकशी करीत आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने यापूर्वीच शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. त्याचवेळी पार्थच्या सांगण्यावरून ‘ईडी’च्या टीमने मोठ्या प्रमाणावर भारतीय चलन जप्त केले आहे.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात कुंतल घोषनेही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती ‘ईडी’कडे आहे. या घोटाळ्यातून कुंतल याने मोठ्या प्रमाणावर अवैध कमाई केल्याचे भक्कम अहवाल प्राप्त झाले आहेत. या कारवाईदरम्यान, ‘ईडी’ या घोटाळ्याशी संबंधित नवीन तथ्ये शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आधीच सापडलेल्या तथ्यांची पडताळणी करीत आहे. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याविरुद्धही अशाच प्रकारचे इनपुट मिळाले होते; मात्र या प्रकरणाचा तपास सुरू होताच प्रकरण खूप मोठे निघाले.

सीबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ ते २०२१ दरम्यान झालेल्या या शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी उमेदवारांकडून शंभर कोटींहून अधिक रक्कम वसूल केली आहे. याशिवाय आरोपींनी शिक्षकांकडून बदली, पदस्थापना आदींमध्ये भरमसाट वसुली केली आहे. बंगालमधील प्रायव्हेट स्कूल ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष तपस मंडल यांनी ही बाब उपस्थित केली होती. तपस यांनी कुंतल घोष यांच्याविरोधात ‘ईडी’कडे तक्रारही केली होती. त्यानंतर ‘ईडी’ने ही कारवाई सुरू केली आहे. कुंतलने सुमारे १९.५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप तापस यांनी केला आहे. कुंतलने नोकरी देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून ही रक्कम घेतली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा