पिंपरीचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्यातील सर्वोत्कृष्ट!

16
Sawali homeless Kendra PCMC
पिंपरीचे 'सावली' बेघर निवारा केंद्र ठरले राज्यातील सर्वोत्कृष्ट

Sawali homeless Kendra PCMC: शहरातील बेघर आणि गरजू नागरिकांसाठी आशेचा किरण ठरलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र हे राज्यातील सर्वोत्तम बेघर निवारा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राने, नुकत्याच राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीने केलेल्या निरीक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नागरी बेघरांना निवारा या घटकाची प्रगती तपासण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीने त्रयस्थ संस्थेद्वारे राज्यभरातील विविध निवाऱ्यांची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, त्रिशरण एनलायनमेंट फाउंडेशन या संस्थेने सादर केलेल्या अहवालात ‘सावली’ निवारा केंद्राला पहिला क्रमांक दिला आहे. मुंबई महापालिकेचे ग्रेस निवारा आणि शहरी बेघर निवारा यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे.

२०२० पासून बेघरांना आधार

२०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १५२ बेघर लाभार्थी आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ऑक्टोबर २०२० मध्ये ‘सावली’ निवारा केंद्राची सुरुवात करण्यात आली. पिंपरी भाजीमंडईच्या पहिल्या मजल्यावर १९ हजार ८६ चौरस फूट जागेत उभारलेल्या या केंद्राची क्षमता १११ व्यक्तींची आहे.

या केंद्रात पुरुष, महिला, बेघर कुटुंबे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि सुरक्षित सोयी उपलब्ध आहेत. एकूण २३ खोल्यांपैकी बेघर कुटुंबांसाठी ७ खोल्या आहेत. पुरुषांसाठी ५ स्नानगृहे व ६ शौचालये, महिलांसाठी २ स्नानगृहे व ६ शौचालये, तसेच दिव्यांगांसाठी विशेष स्नानगृह व शौचालयाची सोय आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मते, “सावली निवारा केंद्र हे केवळ गरजू आणि बेघरांसाठी निवासाचे ठिकाण नसून, त्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करणारे एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे.” या केंद्राला मिळालेल्या या सर्वोच्च स्थानामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे