पुणे, ३१ डिसेंबर २०२२ : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात आज शनिवारी (ता. ३१) रात्री सरवकाही ‘निर्बंधमुक्त’ असेल असा समज करून घेऊ नका. नववर्षाचे स्वागत नेहमीच्या जल्लोषात जरूर करा; पण त्यासाठी काही नियम आखून दिले असून, नियमांच्या चौकटीत राहूनच ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पोलिसांची गस्त राहणार असून, गड-किल्ल्यांवरही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी सहानंतरच गडाकडे जाणाऱ्या वाटा बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे या वर्षी नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींसह शहरालगतच्या विविध ‘फार्म हाउस’वर सेलिब्रेशनला पसंती दिली आहे. ‘थर्टी फर्स्ट’चे यंदाचे सेलिब्रेशन नियमांच्या चौकटीतच करता येणार आहे.
गेल्या काही वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री निर्मनुष्य ठिकाणी जाऊन पार्ट्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गड-किल्ल्यांवर, पायथ्याला, राखीव वनक्षेत्रात बेकायदा तंबू टाकून पर्यटक गेटटुगेदर करतात. करोनाची लाट येण्यापूर्वी या पार्ट्यांची ‘क्रेझ’ वाढली होती. यातून काही गैरप्रकारही उघडकीस आल्याने वनविभागाने राखीव वनक्षेत्र, टेकड्यांवरील ३१ डिसेंबरच्या रात्रीची गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला. संरक्षित क्षेत्रात झालेल्या पार्ट्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. यावर्षी करोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने नवीन वर्षाचे स्वागत जोरदार करण्याचे नागरिकांनी नियोजन केले आहे. त्यामुळे वनविभागानेही वनक्षेत्रात तंबू टाकून होणाऱ्या पार्ट्यांना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाचे कर्मचारी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कार्यकर्ते आणि स्थानिकांच्या मदतीने ताम्हिणी, मुळशी, सिंहगड, लोणावळ्यासह पुण्यातील टेकड्यांवर रात्री गस्त घालणार आहेत.
राखीव वनक्षेत्रांत सूर्यास्तानंतर फिरण्यास बंदी आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील टेकड्या, वनक्षेत्र आणि सिंहगडावर आम्ही गस्त वाढविणार आहोत. राखीव वनक्षेत्रात मद्यपान, पार्ट्या करताना कोणी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सिंहगडावर शनिवारी संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही.
- प्रदीप संकपाळ, वन परिक्षेत्र अधिकारी, पुणे वनविभाग
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील