मुंबई: गोरेगाव येथे आज मनसेचं अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पहिल्यांदाच सावरकर यांची प्रतिमा मनसेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सर्व नंतर आज संध्याकाळी ७ वाजता राज ठाकरे यांचे भाषण गोरेगाव येथे झाले.
यावेळेस राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “माझ्या ‘हिंदू’ भगिनींनो” अशी केली. भाषणाच्या सुरुवातीला ठाकरेंनी मुख्य मुद्द्याला हात घालत झेंड्या विषयी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “भगवा झेंडा हा माझ्या डोक्यात सुरुवातीपासूनच होता. जेव्हा पक्षाची स्थापना झाली त्यावेळेसच हा झेंडा मी पक्षासाठी ठरविला होता, परंतु सोशल इंजीनियरिंग मुळे मला बऱ्याच जणांनी वेगवेगळे सल्ले दिले. मग त्यामध्ये हिरवा असो किंवा इतर कोणती रंग असो हे असे सर्व रंग समाविष्ट करून मनसेचा तो झेंडा बनवण्यात आला.”
पुढे झेंड्या विषयी आणखी बोलताना ते म्हणाले की, “पक्षाचा झेंडा बदलणे ही काही ही मोठी गोष्ट नाही. याआधीही इतर पक्षांनी आपल्या पक्षाचे झेंडे बदललेले दिसले आहेत. भारतीय जनता पार्टीने देखील आपल्या पक्षाचा झेंडा व नाव दोन्ही बदललेले होते. त्याआधीही अशा घटना घडल्या आहेत त्यामुळे पक्षाचा झेंडा बदलणे ही काही मोठी गोष्ट नाही.” यावेळी त्यांनी भगव्या झेंड्याचे समर्थन करताना आपल्या हिंदुत्वा विषयीच्या भावना कार्यकर्त्यांसमोर मांडल्या.
भाषणामध्ये बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचीही ही चांगली कानउघडणी केली. सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करण्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना धाक देत असे म्हटले की, “एखादा वयाने लहान असो मोठा असो किंवा समान असो कोणाविषयी ही टीका करण्याआधी त्यांच्या पदाचा आदर राखला जावा. असे न झाल्यास त्याने त्यास किंवा कार्यकर्त्यास मी सरळ निलंबित करून टाकेल” असे धाक देत त्यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकताना काळजी घ्या असे सांगितले.
हिंदुत्वावर बोलताना ते म्हणाले की, “मी मराठी तर आहेच त्याचबरोबर मी हिंदू देखील आहे त्यामुळे माझ्या हिंदुत्वावर कोणी घात करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. तसेच माझ्या मराठी पानावर कोणी बोलले तर तेही मी खपवून घेणार नाही. या आधीही मी पाकिस्तानी ॲक्टर व सिंगर यांच्याविरोधात आवाज उठवला होता त्यावेळेस मला कोणी म्हटले नाही तुम्ही हिंदुत्वाची का बाजू घेता. मग आता मला हिंदुत्व वरून बोलणारे हे कोण.”
राज ठाकरेंनी एका अर्थी भाषणांमधून एन आर सी व सी ए ए ला समर्थन दिल्याचे दिसून आले. त्याचबरोबर ते म्हणाले की भारतातील मुस्लीम हे आपलेच आहेत त्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. ते आपले आहेत व आपल्याच राहतील.
यावेळेस राज ठाकरे यांच्या घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. घरातील सर्व सदस्यांमध्ये उत्साही वातावरण होते त्याचबरोबर तेथे मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळेस राज ठाकरे यांना भगव्या झेंड्याचा व त्यावर राजमुद्रा असलेला मोमेंट देण्यात आला. त्याचबरोबर जिरेटोप देण्यात आला.