भाजपा नेत्यांची अवस्था “घर का ना घाट का”

कोरोनाच्या संकटाने सर्व जग भयभित झाले असताना भारतातील केंद्र-राज्य सरकारच्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या राजकीय सत्तापिपासू कुरघोड्या सुरु आहेत. हि वेळ राजकारण करण्याची नाही असे सर्व राजकीय पक्षाच्या राष्ट्रप्रेमी नेत्यांना वाटते. परंतु त्याच्यांच पक्षात सत्तेची खुर्ची कशी मिळेल. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता असणारे नेते आणि दुसरीकडे विद्यमान संसाधनाच्या आधारे कोरोनावर कशाप्रकारे मात करता येईल याचा अहोरात्र विचार करून यंत्रणा सुरळीत चालविणारे नेते.

महाराष्ट्राचे राजकारण आणि कोरोनाच्या माध्यमातून उद्भवलेले जागतिक संकट यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतांना काही राजकीय पक्षाकडून चाललेला राजकीय पोरखेळ हा संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहते आहे. एक सर्वसाधारण संकेत आहे कि भारतावर संकट असेल तर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांनी आपले अंतर्गत मतभेद विसरून एकत्र येऊन काम केले पाहिजे, पण असे होताना दिसत नाही.

केंद्र आणि राज्य पातळीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षाची सत्ता असेल तर केंद्रसरकार अशा राज्यांना राजकीय हेतूने कोंडीत पकडण्याचे काम करते आहे कि काय असा प्रश्न समोर येतो आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी केली आहे ते यासाठी वारंवार राज्यपालाच्या भेटी घेत आहेत आणि राज्यपाल काहीही अविवेकी निर्णय घेऊ शकतात. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या काळात राज्यपालांनी ज्या राजकीय कुरघोड्या केल्या ते त्या पदाला अशोभनीय तर होत्याच शिवाय असंसदीय मार्गाने जे काही करता येईल ते राज्यपाल महोदयांनी केले.

संपूर्ण भारत देश कोरोना संकटाने ग्रासलेला असताना केवळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणे म्हणजे केवळ राजकीय स्वार्थापोटी केलेली मागणी आहे असे म्हणणेच उचित ठरेल. महाराष्ट्र कोरोनासारख्या जागतिक संकटातून जात असताना विरोधी पक्षांतील भाजपा नेत्यांनी सत्ताधारी वर्गाच्या हातात हात घालून काम केले पाहिजे होते, पण भाजपा नेत्यांची मदत तर सोडा उलट सरकार कसे अडचणीत येईल, त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे सरकारने शेतकरी कर्जमाफी केली आणि लगेच कोरोनासारखे संकट आ वासून समोर उभे राहिले अशा परिस्थितीत हि सरकारने महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या आधारे तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या साथीने कोरोनासारख्या जागतिक संकटाला मोठ्या प्रमाणात पसरू दिले नाही तसेच महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा महाराष्ट्र पोलीस यांनी देखील लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे मोलाचे कार्य केले.

गेल्या पाच वर्षात कोणत्याही क्षेत्रात नोकरभरती प्रक्रिया राबविली नाही. केवळ अभ्यासगट स्थापन केले त्यातून फक्त घोषणा बाहेर येत होत्या. प्रत्यक्ष अमलबजावणी मात्र नाही. गेल्या पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात आणि महाराष्ट्र पोलीस या दोन्ही विभागात आवश्यक ती भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे विद्यमान आरोग्य यंत्रणेत आणि महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत काम करणारे अल्पसंख्य कर्मचारी स्वत:चा जीव मुठीत घेऊन अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशा सर्व आर्थिक आणि प्रशासकीय संकटात सापडलेल्या महाराष्ट्राच्या मदतीला धावून येण्याऐवजी महाराष्ट्र आणखी कसा संकटात जाईल आणि आम्ही परत कसे सत्तेत येऊ याची स्वप्ने भाजपा नेते पाहत आहे. भाजपा नेते म्हणतात आम्ही कोरोनाची परिस्थिती यापेक्षा चांगली हाताळली असती पण आपणास महाराष्ट्र जाणतो आहे कि कोल्हापूर सांगली भागात जेव्हा महापूर आला तेथील जनजीवन विस्कळीत झाले तेव्हा भाजपा नेते पुढील सत्ता कशी मिळेल यासाठी प्रयत्न करित होते आणि इतर पक्षाचे नेते महापूर परिस्थिती कशी नियंत्रणात येईल यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नशील होते त्यामुळे भाजपा नेते किती जनतेच्या मदतीला धावून जातात हे महाराष्ट्राने पाहिले आहे.

महाराष्ट्र पातळीवरील भाजपाने पंतप्रधान निधीला मदत केली परंतु मुख्यमंत्री निधीला मात्र मदत केली नाही.याचा अर्थ एकच होतो, महाराष्ट्रातील जनतेच्या मतावर निवडून आलेल्या भाजपा खासदार-आमदार यांच्या निष्ठा दिल्लीशी म्हणजेच भाजपाशी आहेत महाराष्ट्रातील जनतेशी नाही.

पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी अवस्था महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची झाली आहे त्यामुळे त्यांना काय करावे सुचत नाही, काय बोलावे कळत नाही, काय बोलू नये याचे भान देखील भाजपा नेत्यांना राहिलेले नाही. केंद्रीय भाजपा नेतृत्व घोषणाबाजीला तर महाराष्ट्र भाजपा नेतृत्व हे अभ्यासगट स्थापनेला महत्व देते असे असताना हि विद्यमान कोरोना संकटांच्या काळात केंद्र सरकारची मदत घेऊन भाजपा नेते महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीमागे उभे राहतील असे वाटत होते. परंतु महाराष्ट्र भाजपा नेते केवळ सत्ता कशी मिळेल , यासाठीच अकांड तांडव करित आहेत, हि बाब सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी नाही. आता वेळ आली आहे महाराष्ट्रातील भाजपा खासदार-आमदार यांची निष्ठा देशाशी तसेच महाराष्ट्राशी आहे कि भाजपाशी आहे.

महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्व कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करित आहे तसेच काळे वस्त्र परिधान करून जनतेच्या पाठींब्याविना आंदोलन केले. या महाराष्ट्र भाजपा नेत्यांच्या मागणीला आणि आंदोलनाला जनतेचा पाठिंबा तर मिळालाच नाही तसेच भाजपा केंद्रीय नेतृत्वाने देखील फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांची “घर का ना घाट का” अशी अवस्था झाली आहे. जर केंद्रीय नेतृत्वाचे छुपे समर्थन असेल तर केंद्रीय भाजपा नेतृत्वाने आणि महाराष्ट्र भाजपा नेतृत्वाने आत्मचिंतन करून आणखीन अभ्यासवर्ग निर्माण करण्याची गरज आहे. घटनात्मक दृष्टीने विचार केला तर केवळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही ती इतर राज्यात हि त्याच धरतीवर लागू करावी लागेल तसेच शक्य झाल्यास संपूर्ण देशातच राष्ट्रपती राजवट लागू करणे उचित राहील. कारण कोरोनाचे संकट जागतिक आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात आला आणि तो प्रसारित झाला याला जबाबदार केंद्र सरकार आहे, कोणतेही राज्य सरकार नाही. त्यामुळे सत्तेसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हि भाजपा नेतृत्वाच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षणच म्हणावे लागेल.

-डॉ. मल्हार शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा