२६ नोव्हेंबर २००८ संहाराची १३ वर्षे

पुणे २६ नोव्हेंबर २०२१; आज २६/११, माझ्या पत्रकारितेतल्या कामाचा न विसरणारा दिवस. त्यावेळी साम Tv नुकताच सुरु झाला होता. माझी सेकंड शिफ्ट होती. दहशतवादी हल्ल्याची बातमी कळली. त्यावेळेस असलेले आमचे ब्युरो हेड प्रमोद चुंचुवार सर बेलापूरला आले. त्यांना म्हंटलं की तुम्हाला रिपोर्टिंगला मदत हवी असेल तर सांगा. त्यांनी हेड अशोक सुरवस् सरांना सांगून मी ताज हॅाटेलच्या दिशेने निघाले. २००८ मध्ये तो बुधवार होता. त्यारात्रीपासून शनिवार पर्यंत मी ताजच्या खाली बसून रिपोर्टिंग करत होते.

ओबी व्हॅन नसल्याने साध्या नोकिया फोनवरुन बातम्या पुरवत होतो. तीन दिवस अंघोळ नाही, जेवण नाही, तसेच काम करत होतो. तहान भूक विसरुन काम करणे, या. म्हणीचा अर्थ तेव्हा कळला. पण शेवटपर्यंत काम करुन ताजमधल्या करिमचाऱ्यांना जेव्हा बाहेर आणले, तेव्हा केलेल्या कामाचे सार्थक झाले , असे वाटले. चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी हा थरार संपला. पण तेव्हा अवस्था न ओळखण्यासारखी झाली होती. रंग करपलेला, आवाज बसलेला , या स्थितीत मी जेव्हा सामच्या ॲाफिसला पोहोचले , तेव्हा माझी मलाच मी अनोळखी होते. साम टिव्ही ने ‘ ते ५९ तास’ अशी चार तासांची मालिका प्रसिद्ध केली. आज ते सगळं आठवून खरच मन भरुन आलं. कसाबसारख्या क्रुर माणसाचा मनसुबा सफल न होऊ देण्यात माझा खारीचा वाटा आहे, हे सांगताना अभिमानही वाटतो आणि ऊर भरुन येते.

तृप्ती पारसनीस पुणे .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा