मोदींनी देश २०० वर्ष मागे नेण्याचे काम केले, शरद पवार यांची टीका

पुणे, १३ ऑगस्ट २०२३ : संभाजी बिग्रेडने आजचा सोहळा एका वेगळ्या उद्देशाने आयोजित केला आहे. संघटनेत अनेक लोक काम करतात. संभाजी ब्रिगेड वेगळ्याप्रकारे काम करते. बहुजन समाजातील नव्या पिढीने अर्थकारणात सक्षम जाण निर्माण करण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेड सांगते. राज्यात आणि देशात अनेक लोक असे आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अनेक तरुण वेगळा विचार करतात. आपले अनेक आदर्श आहेत. अनेक कर्तुत्ववान असणारी माणसे या महाराष्ट्रात जन्माला आली. अनेक लोक त्यांचा विचार बाजूला ठेवून अनेकदा वेगळी भुमिका घेतात,असा टोला शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

आज राज्यात जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे.आपण सगळे एकत्रित राहू. आपल्याला यावर विचार केला पाहिजे. आपण एका नव्या समाजाची रचना केली पाहिजे. त्या दृष्टीने पाऊले टाकली पाहिजे. राज्याचे राजकारण धर्माकडे नेले जात आहे का? राज्याचे राजकारण धर्माकडे नेण्याचा जरी विचार असला तरी मला वाटत की मराठी माणूस ते होऊ देणार नाही.त्याची चिंता करण्याची गरज नाही असे होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले,संसदेचे उदघाटन करताना देशाचे पंतप्रधान साधू घेऊन गेले. त्यांच्या पाया पडले हे चुकीचे आहे. ते आपल्या देशाची संसद आहे जिथून देशाची दिशा ठरवली जाते तिथे आपल्या देशाचे प्रमुख त्यांना घेऊन जातात आणि दंडवत करतात. ते लोक कोण होते ते माहित नाही. संसदेत कुठलाही कार्यक्रम असला की राष्ट्रपती असतात. संसदेची नवीन वास्तू बांधली पण त्यांना निमंत्रित केले नाही. त्या महिला आहेत म्हणून बोलावले नाही? उपराष्ट्रपतींनाही बोलावले नाही. असा सोहळा देशाच्या कार्यपद्धतीत न बसणारा आहे. असे वागून समाजाला २०० वर्ष मागे नेण्याचे काम तुम्ही करत आहात, अशी टीका त्यांनी मोदी यांच्यावर केली.

आजच्या युवकांनी सध्याच्या राजकारणाचा अभ्यास करावा. अर्थकारणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यवसायाला महत्व दिले पाहिजे. धोरणात्मक निर्णय घेणारी व्यवस्था आणि तिचा दृष्टिकोन किती महत्वाचा याचा विचार केला पाहिजे. देशाचे चित्र बदलत आहे. मोदींच्या विचारांचा पक्ष राज्यात दुसऱ्या विचाराने जात आहे. केरळमध्ये त्यांचे राज्य नाही. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गोव्यात देखील नव्हते पण त्यांनी फोडाफोडी केली. आपल्या राज्यात कसे सरकार आणले हे तुम्हीं बघितले. अनेक राज्यात त्यांचे सरकार नाही. हे सत्य आहे. लोकांना बदल हवा हे तो बदल होत आहे,असे पवार म्हणाले.

आम्ही लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही इंडिया मधून एकत्र होत आहोत. लवकरच तिसरी बैठक घेत आहोत. आमचा प्रयत्न आहे की ज्या धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे ती धोरणे राबवली पाहिजे. सगळे घटक आम्हीं एकत्र करत आहोत. तुम्ही सगळे सोबत राहिलात तर त्यात यश येईल,असेही शरद पवार म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा