पुणे शहरात ह्युंदाई कंपनीचा मोठा प्रकल्प येणार, चार हजार कोटींची गुंतवणूक, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे, १३ ऑगस्ट २०२३ : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्रातून काही कंपन्या बाहेर गेल्या. त्यामुळे राज्यातील गुंतवणुकीवरुन काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी आणि युती सरकारमध्ये आरोप, प्रत्यारोप झाले होते. वेदांता फॅाक्सकॅान, एअरबस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क हे चार प्रकल्प गेल्या वर्षभरात राज्याकडून निसटले. त्यास कोणते सरकार जबबादर होते, हा वाद रंगला होता. त्यानंतर त्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. ही श्वेतपत्रिका पावसाळी अधिवेशनात मांडली गेली. यामध्ये हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले हे मांडण्यात आले. आता राज्यात गुंतवणूक पर्व सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहरात गुंतवणूक आली आहे.

वाहन निर्मिती क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी ह्युंदाई ने भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी राज्यातील पुणे शहरामध्ये गुंतवणूक करणार आहे. दोन टप्प्यांत ही गुंतवणूक केली जाणार आहे. एकूण पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ह्युंदाई कंपनीचे पुरवठादारही पुण्यात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पुणे शहरात ह्युंदाई कंपनी व्यतीरिक्त एलजी कंपनी आपला विस्तार करणार आहे. एलची कंपनी सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ह्युंदाई कंपनीच्या गुंतवणुकीमुळे पुणे शहरात ४ हजार ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. ही कंपनी २०२८ पर्यंत गुंतवणूक करणार आहे. लोट्टे वेलफूड ही कंपनी त्यांच्या पुणे येथील प्रकल्पात ४७५ कोटी रुपये गुंतवणार आहे. ही कंपनी हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन करणार आहे.

राज्याचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियात गेले होते. त्यावेळी अनेक कंपन्यांशी चर्चा झाली आहे. त्यातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे. दक्षिण कोरियाचे एक शिष्टमंडळ लवकरच राज्यात येणार आहे. त्यावेळी अनेक करार होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. राज्यात गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या तयार आहेत. यामुळे येत्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक प्रकल्प येतील आणि रोजगार निर्मिती होईल, असे सामंत यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा