पुणे: आपला जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आपली विचारधारा सोडली आहे. अशा वेळी ती जागा भरून काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांचा वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दरेकर बोलत होते.
यावेळी दरेकर यांनी सांगितले की, शिवसेनेत मंत्रिपदावरून एक दोन नाही तर डझनभर आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पण जर सेनेनं भाजपशी युती तोडली नसती तर शिवसेनेला आणखी मंत्रिपदं मिळाली असती, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ पक्षाची स्थापना केली होती. २००९मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवताना राज ठाकरे यांच्या मनसेने १३ आमदार निवडून आणत दणक्यात सुरुवात केली होती. मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये वर्षांत मनसेची वाटचाल अडखळली आहे.
२३ जानेवारी रोजी मुंबईतील गोरेगाव येथे होणाऱ्या महाअधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणती घोषणा करणार याबाबत सर्वांना उत्सुकता आली आहे.