दिल्ली: व्हिडिओकॉन टेली आणि एअरसेलवर एजीआर थकबाकी भरण्यासाठी दूरसंचार विभाग एअरटेलवर दबाव आणू शकतो. या दोन्ही कंपन्या भारती एअरटेलने खरेदी केल्या आहेत. २०१७ मध्ये सुनील मित्तल यांच्या मालकीच्या एअरटेलने या दोन दिवाळखोर कंपन्यांकडून काही स्पेक्ट्रम खरेदी केले होते.
याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दूरसंचार विभाग भारती एअरटेल आणि व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या स्पेक्ट्रम डीलची चौकशी करत आहे. या प्रकरणात व्हिडीओकॉनच्या थकबाकीची परतफेड करण्याची जबाबदारी एअरटेलवर टाकली जाऊ शकते.” व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्स दिवाळखोरी झाली आहे आणि ती दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आहे. व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशनवर लायसन्स, स्पेक्ट्रम वापर शुल्क, व्याज आणि दंड शुल्काच्या स्वरूपात १२९८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “टेलिकॉम कंपन्यांना एजीआरचा आठ टक्के परवाना फी म्हणून आणि ३-५% टक्के एसीआर म्हणून भरावा लागेल. आता दूरसंचार विभाग या प्रमुख कंपनीतून किती पैसे वसूल करायचे आहे याचा शोध घेत आहे.” दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना नोटीस पाठविली असून, त्यांच्या थकबाकीचे स्वत: चे मूल्यांकन करुन तीन महिन्यात थकबाकी भरण्यास सांगितले. जर दूरसंचार विभाग आणि दूरसंचार कंपन्यांच्या मोजणीत काही फरक असेल तर थकबाकी भरण्यासाठी पुन्हा दूरसंचार कंपन्यांना नोटीस पाठविली जाऊ शकते.