पुणे, २६ मार्च २०२३: भोजपुरीची लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबे या जगात नाही. आज म्हणजेच २६ मार्च रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे यांचा मृतदेह सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्यांच्या आत्महत्येची बातमीने सगळीकडं खळबळ उडाली आहे. आकांक्षा २५ वर्षांची होती आणि तिनं फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. आकांक्षा दुबे ही भदोहीची रहिवासी होती आणि तिची गणना उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये होते.
आकांक्षाने भोजपुरी चित्रपट, म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं होतं. पूर्वी ती टिकटॉकवर व्हिडिओ बनवायची आणि त्यानंतर २०१९ मध्ये ‘मेरी जंग मेरा फैसला’ या सिनेमाद्वारे तिला भोजपुरी सिनेमात ब्रेक मिळाला. या चित्रपटात ती खेसारी लाल यादव यांच्यासोबत दिसली होती. त्यानंतर तिनं निरहु-पवन सिंग सारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं.
एकीकडे आज तिच्या आत्महत्येची बातमी येत असतानाच दुसरीकडं आज तिचं पवन सिंहसोबतचं नवीन गाणेही रिलीज झालंय. ‘ये आरा कभी नही हारा’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. त्याचबरोबर ती सध्या तिच्या आगामी ‘एक दिन की सास’ या चित्रपटात व्यस्त होती. यात काजल राघवानी, जय यादव असे स्टार्स दिसणार होते. नुकतेच तिने समरसोबतच्या नात्याची पुष्टीही केली होती. चित्रपटांसोबतच तिनं अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड