भोसरी रुग्णालयात ‘दारूच्या पार्ट्या’ रुग्णसेवेला कलंक! कारवाईची टांगती तलवार!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात सुरू असलेल्या एका धक्कादायक प्रकाराने आरोग्य सेवेलाच गालबोट लावले आहे. रुग्णांना सेवा देण्याच्या जागी येथील काही कर्मचारी चक्क दारूच्या पार्ट्या करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

१०० खाटांच्या या प्रमुख रुग्णालयात सामान्य रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र एक्स-रे टेक्निशियन दारूच्या नशेत धुंद होऊन काम करत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेवर, विशेषत: महिला रुग्णांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासंबंधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक्स-रे टेक्निशियन दारूच्या पार्ट्या करताना आणि रिकाम्या बाटल्यांचा बॉक्स स्पष्टपणे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना याची खबर लागू नये म्हणून एक्स-रे विभागाचा दरवाजा बाहेरून लॉक करून या पार्ट्या केल्या जात होत्या.
यामुळे रुग्णालय प्रशासनाची बेजबाबदार वृत्ती आणि या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष उघड झाले आहे.

रात्रपाळीतील हे कर्मचारी दारूच्या नशेत तर्राट असल्याने इतर कर्मचाऱ्यांनाही त्रास देत होते, तसेच उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी उद्धटपणे वागत होते. यामुळे रुग्णालयातील प्रशासकीय बेजबाबदारपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत महापालिकेने दोन एक्स-रे टेक्निशियनसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी, ‘रात्रपाळीतील कर्मचारी दारूच्या नशेत तर्राट होते आणि रुग्णांशी गैरवर्तन करत होते,’ असे स्पष्ट करत अशा घटना भविष्यात इतर कोणत्याही रुग्णालयात होणार नाहीत यासाठी सर्व रुग्णालय प्रमुख आणि सुरक्षारक्षकांना खबरदारीच्या सूचना दिल्याचे नमूद केले आहे.

रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकारावर महापालिकेने कठोर कारवाई केल्याने प्रशासकीय शिस्त पुन्हा स्थापित होण्याची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे