Bhosari Murder Case : पिंपरी-चिंचवड शहरात एका भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. भोसरी परिसरात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला असून, मारेकऱ्यांनी त्याच्या शरीराचे पाच तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केवळ मृतदेहाचे धड मोशी येथील खाणीत सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिद्धराम प्रभू ढाले (वय ४५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे या दुर्घटनेतील बळी ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धराम हे २९ मार्च रोजी सकाळी कामासाठी घरातून निघाले, परंतु सायंकाळपर्यंत ते परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा बराच शोध घेतला, मात्र ते न सापडल्याने अखेर ३१ मार्च रोजी दिघी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असतानाच, २ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मोशीतील कानिफनाथ खडी मशीन समोरील खाणीत एका अज्ञात व्यक्तीचे धड आढळून आले. अधिक तपास केला असता, हे धड बेपत्ता झालेले सिद्धराम ढाले यांचे असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सिद्धराम यांच्या शरीराचे धारदार शस्त्राने पाच तुकडे करण्यात आले होते. मारेकऱ्यांनी त्यांचे डोके, चेहरा, डावा पाय आणि दोन्ही हात धडावेगळे केले असून, ते अज्ञात ठिकाणी फेकून दिले आहेत.
या क्रूर कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, उर्वरित शरीराचे तुकडे शोधण्यासाठी आणि आरोपींचा माग काढण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे