पुणे जिल्ह्यातील भूगाव गावकऱ्यांनी शासनाचा निधी न घेता तयार केला रस्ता, गाव खड्डेमुक्तीचा अनोखा उपक्रम

पुणे, ७ ऑगस्ट २०२३ : राज्यात कायमच पावसाळा सुरू झाला की रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची चर्चा सुरु होते. वर्षानुवर्षे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होत असते. त्यासाठी आंदोलने केली जातात. उपोषणे केली जातात. लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयात नागरिक खेटे घालतात. या नंतरही अनेकवेळा खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत.आता पुणे जिल्ह्यातील भूगाव ग्रामस्थांनी, गाव करील ते राव करील का? या म्हणीचा प्रत्यय आणून दिला आहे. गावकऱ्यांनी आपल्या गावात रस्ते तयार केले आहेत. त्यांनी आपले गाव खड्डेमुक्त केले आहे. गावकऱ्यांचा हा उपक्रम आता चांगलाच चर्चेत आला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भूगाव येथील कामाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पुणे शहरापासून फक्त २१ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या फक्त ५ हजार ९४९ आहे. या लहान गावाने राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गावात चार वर्षांपासून रस्त्यांची समस्या होती. त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या. अधिकाऱ्यांना गावात रस्ते करण्यासंदर्भात निवेदन देऊन विनवणी केली. परंतु ही समस्या काही सुटली नाही. मग गावकऱ्यांनीच हिरीरीने पुढाकर घेतला.

गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले. त्यांनी गावात रस्ते करण्यासाठी आता शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता काम करण्याचा निर्णय घेतला. गाव खड्डेमुक्त करण्यासाठी निधी जमवण्यास सुरुवात केली. पाहता, पाहता गावकऱ्यांना चक्क ७५ लाखांच्या निधी लोकवर्गणीतून जमवला. हा निधी खड्डेमुक्त रस्ता निर्माण करण्यासाठी वापरणे सुरु केले. गावात सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते तयार करण्याचे काम सुरु झाले. लोकवर्गणीतून खड्डेमुक्त गावठाणाचा नवा मुळशी पॅटर्न भूगाव ग्रामस्थांनी उभा केला आहे.असा उपक्रम राज्यात प्रत्येक गावात सुरु झाल्यास सर्वत्र चांगले रस्ते उभे राहणार आहेत. परंतु तळागाळापर्यंत पायाभूत सेवा देण्याची शासनाची उदासीनता राज्यकर्ते कधी झटणार? हा प्रश्न निरुत्तरीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा