भुजबळांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला मालेगावात विरोध

नांदगाव, नाशिक, २३ फेब्रुवारी २०२४ : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या येवला मतदारसंघात मराठा आंदोलनाची झळ बसली असतांना आज भुजबळांचे चिरंजीव माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही नांदगाव मतदारसंघात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

माजी आमदार असलेले पंकज भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता या मतदारसंघाचा काही भाग मालेगाव तालुक्यात समाविष्ट आहे. या भागातील मांजरे, कौळाणे, नगाव, टाकळी, वराने आदी गावांत पंकज भुजबळ यांचा दौऱ्याची सुरुवात होताच नगाव येथे त्यांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला व घोषणा देत पंकज भुजबळांचा निषेध केल्याने काहीसा गोंधळ झाला. हा गोंधळ पाहता भुजबळ तेथून निघून गेले.

यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न समाधानकारक सुटत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याला मतदारसंघात फिरू देणार नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्यं केलेली आहेत. समाजाचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळे जोपर्यंत ते मराठा समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना मतदारसंघात दौरा करू देणार नाही’, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा