वाल्हे येथे श्रीज्ञानेश्वर माऊली वारकरी विद्या मंदिराचे भूमिपूजन

पुरंदर दि.१४ ऑक्टोबर २०२०:पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे काल मंगळवार दि. १३ रोजी कमला एकादशीचे औचित्य साधत सुकलवाडीफाटा येथील संत ज्ञानेश्वर महाराज तळाशेजारी, महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा
संघाच्यावतीने श्रीज्ञानेश्वर माऊली वारकरी विद्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती महर्षि वाल्मिकी सेवा संघाचे संस्थापक अशोक महाराज पवार यांनी दिली आहे.

वाल्हे येथील आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी यांच्या वाल्मिकनगरीमध्ये महर्षि वाल्मिकी सेवा संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. वाल्मिकींच्या संजीवन समाधीस्थळासह वारकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे हा संघाची स्थापना करण्यामागचा उद्देश असल्याचे पवार यांनी सांगितले. वारकरी सांप्रदायातील वाल्हे नजिक कामठवाडी येथील महावीर धोंडिबा नवले व त्यांच्या पत्नी साधना नवले यांनी महर्षि वाल्मिकी सेवा संघाच्या कार्यालसाठी तीन गुंठे जागा उपलब्ध करुन दिली. त्याठिकाणी कमला एकादशीचे औचित्य साधत महर्षि वाल्मिकी पालखी सोहळ्याचे चोपदार लक्ष्मण बुनगे यांच्या हस्ते श्रीज्ञानेश्वर माऊली विद्यामंदिराचे भुमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी सचिन दुर्गाडे, खजिनदार भाऊसाहेब चव्हाण, जयराम पवार, पांडुरंग पवार, जयराम पवार, सर्जेराव कदम, रामचंद्र पवार,राजाराम दुर्गाडे, संदिप दुर्गाडे, भाऊसो गिरमे आदि उपस्थित होते.

याबाबत हभप. अशोक महाराज पवार यांनी संगैतले की, शासनाच्या नियमांचे पालन करीत संघाच्या वतीने महर्षि वाल्मिकींच्या समाधी मंदिराचा प्रचार व प्रसार करणे त्याचबरोबर वारकरी प्रशिक्षण केंद्र चालवणे, गो शाळेची उभारणी करणे, गोरगरीब व निराधार लोकांची मदत करणे, अनाथाश्रम यांसह विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा