पुणे, दि. २५ मे २०२०: १९ तारखेपासून भुसार मार्केट बंद होतं कारण या परिसरात झालेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे भुसार मार्केट मध्ये जवळपास पंधरा व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू सुद्धा झाला होता. याच पार्श्वभूमीवर १९ तारखेपासून भुसार मार्केट बंद करण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र २३ तारखेला या संदर्भात शिखर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या व्यापाऱ्यांना निवेदन दिले होते. धान्याचा पुरवठा महत्त्वाचा आहे, त्यासाठी काही नियम घालून देण्यात आलेले आहे. त्यानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून बाजाराला सुरुवात झालेली आहे. हा बाजार आता सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत सुरू असणार आहे.
गर्दी होऊ नये यासाठी १०० वाहनांना प्रवेश दिला जाईल. प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून भुसार मार्केट मध्ये सर्व व्यवस्था सध्या सुरू करण्यात आलेली आहे. सध्या याठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांचा असणार आहे.
येणारे व्यापाऱ्यांसाठी आणि लोकांसाठी निर्जंतुकीकरणची सोय करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजर, थर्मल स्क्रीनिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी