मध्य प्रदेश, ३ जून २०२३ : दमोहमध्ये हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास लावल्याने वादात सापडलेल्या शाळेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द केली आहे. मान्यतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालय,दमोहची मान्यता रद्द करण्याचा आदेश सहसंचालक सार्वजनिक शिक्षण सहाय्यक सागर विभाग यांनी जारी केला आहे.
मध्य प्रदेशातील दमोह येथील एका शाळेच्या पोस्टरमध्ये हिंदू मुलींना हिजाबमध्ये दाखवल्याचे प्रकरण समोर आले होते. नुकतेच गंगा जमुना शाळेचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाळेच्या निकालाच्या पोस्टरमध्ये टॉपर हिंदू मुलींनी हिजाब घातलेले दिसत होते. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर भाजपने त्यावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली आहे.
इतकेच नाही तर हिजाब घातलेल्या हिंदू मुलींचे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाचे पथकही शाळेत गेले. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर दमोहच्या डीएम आणि एसपींनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागवला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड