मुंबई, ७ ऑक्टोंबर २०२२ : अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग NCB ने मोठी कारवाई करत मुंबईतील ड्रग्ज तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलं आहे. अंमलीपदार्थाच्या गोदामावर कारवाई करून ५० किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ४ लोकांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच जामनगरमधून मिळालेल्या माहितीनंतर तिथूनही १० किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार NCB मुंबई , जामनगर नेव्हल युनिट, NCB जामनगर यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. तर अंमलीपदार्थाच्या गोदामावर कारवाई करून ५० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियत्रण विभागाला (एनसीबी) ला यश आले आहे. याप्रकरणी गुजरातमधूनही १० किलो एमडी जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची किंमत १२० कोटी रुपये आहे. याप्रकरणी एकूण ४ जणांना अटक केली असून यातील ३ मुंबई तर १ जामनगरमधील आहे. मुंबई आणि गुजरात राज्यात हे रॅकेट सक्रिय झाले होते.
एनसीबीने या प्रकरणात जामनगरमधून माजी वैमानिक सोहेल गफार रहीदा याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडिया विमानात पायलट होता. मात्र, मेडीकल कारणास्तव त्याने एअर इंडिया सोडल्यानंतर एमडी तस्करीचं काम सुरू केलं. सोहेलने अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्याने एअर इंडियामध्ये काम केले आहे, याच्यासह आजुन दोघांना अटक केली आहे.
दुसरा आरोपी मिथेन बिचाई दास याला २००१ मध्ये एनडीएच्या तस्करीत अटक करण्यात आली होती. परंतु बेल मिळाल्यानंतर तो पुन्हा या तस्करीत सक्रिय सहभागी असल्याचं आढळून आलं. २२५ किलो एमडी ड्रग्ज या टोळीने मागच्या वर्षी वितरीत केले असल्याचं समोर आलं आहे. हे दोघेही केरळ आणि गुजरातमधील रहिवासी असून जप्त केलेले अंमलीपदार्थ फोर्टमधील कबुतरखाना परिसरातील गोदामात सापडले. तर मुंबईतील एका प्रयोगशाळेत हे एमडी ड्रग्ज बनवले जात होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे