दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा गँगस्टर टेरर फंडिंग प्रकरणांबाबत कारवाई करण्यात आली. एनआयएने यूपी-पंजाब-हरियाणा-राजस्थान, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये एकाच वेळी ७० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंगमध्ये लॉरेन्स आणि त्याचे सिंडिकेट वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरल्याचे पुरावे मिळाल्यानंतर तपास यंत्रणा ही कारवाई करत आहे. यापूर्वी गेल्या वर्षाच्या अखेरीस दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. या छापेमारीत अनेक ठिकाणी शस्त्रे देखील सापडली आहेत.
दरम्यान, पंजाबमध्ये कॅनडामध्ये बसून दहशत पसरवणाऱ्या लखबीर लांडा, टिल्लू ताजपुरिया, गँगस्टर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्या जवळच्या साथीदारांवर एनआयएने छापे टाकले आहेत. यानंतर एजन्सीने एक गुंड आणि वकिलालाही अटक केली होती. तर काही दिवसांपूर्वी लखबीर लांडा याला एनआयएने दहशतवादी घोषित केले असून त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर सतत नजर ठेवण्यात येत होती. त्यानंतर एनआयएने तरनतारन, फिरोजपूर आणि माळव्यातील काही शहरांमध्ये छापे टाकले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक