लिओनेल मेस्सीची निवृत्ती विषयी मोठी घोषणा, कतार २०२२ असेल शेवटचा विश्वचषक

पुणे, ७ ऑक्टोंबर २०२२: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. २०२२ मध्ये होणारी फुटबॉल विश्वचषक ही त्याची शेवटची मोठी स्पर्धा असल्याचं मेस्सीने जाहीर केलंय. म्हणजेच या विश्वचषकानंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, कारण त्यानंतर पुढील विश्वचषक चार वर्षांनीच होणार आहे.

अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल याची पुष्टी केलीय. एका मुलाखतीत, जेव्हा त्याला विचारले गेलं की हा त्याचा शेवटचा विश्वचषक आहे, तेव्हा तो म्हणाला की हो, हा अगदी शेवटचा आहे. २०२२ नंतर पुढचा फुटबॉल विश्वचषक २०२६ मध्ये होईल आणि तेव्हा लिओनेल मेस्सी ३९ वर्षांचा असंल. यामुळेच त्याने शेवटचा विश्वचषक आधीच पक्का केलाय.

३५ वर्षीय लिओनेल मेस्सीने सांगितलं की, मला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटत आहे, मला आशा आहे की विश्वचषकापूर्वीही माझा हंगाम चांगला जाईल. ही माझी पहिली वेळ नव्हती, मी दुखापतीतून पुनरागमन केलंय आणि आता बरे वाटत आहे. आता मी विश्वचषकाचे दिवस मोजत आहे, ही वस्तुस्थिती आहे की जसजसा वेळ जवळ येत आहे तसतशी अस्वस्थता वाढत आहे.

मेस्सी रेकॉर्डचा बादशहा

लिओनेल मेस्सीची गणना सध्याच्या काळातच नव्हे तर सर्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्येही केली जाते. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिनासाठी ९० गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम ख्रिस्तियानो रोनाल्डो (११७ गोल) यांच्या नावावर आहे.

जर आपण क्लब फुटबॉलबद्दल बोललो तर बार्सिलोना क्लबकडून बराच काळ खेळणारा लिओनेल मेस्सी सध्या पॅरिस सेंट जर्मन क्लबचा भाग आहे. काही वेळापूर्वी त्याने बार्सिलोना सोडलं. मेस्सीने बार्सिलोनासाठी एकूण ४७४ गोल केले आहेत, तर पीएसजीसाठी त्याने आतापर्यंत ११ गोल केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा