नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर २०२२ दिल्ली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपने आम आदमी पार्टीला मोठा धक्का दिलाय. आम आदमी पक्षाच्या तीन माजी आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये कमांडो सुरेंद्र सिंह, त्रिलोकपुरी मतदारसंघाचे माजी आमदार राजू धिंगाण आणि गोकलपूरचे माजी आमदार चौधरी फतेह सिंह यांचा समावेश आहे.
आप पक्षाच्या या तिनही माजी आमदारांनी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
आम आदमी पक्षाच्या तीन माजी आमदारांना सदस्यत्व दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेने प्रभावित होऊन या तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप परिवारात सर्वांचे स्वागत आहे.
कमांडो सुरेंद्र सिंह म्हणाले की, केजरीवाल सत्तेत येण्यापूर्वी भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार असे सांगत असत. मागील आठ वर्षात किती लोकांना तुरुंगात टाकले हे त्यांनी सांगावे. फतेह सिंग यांनी सांगितले की, २०१५ मध्ये मी ज्या परिवाराला सोडून गेलो होतो, त्याच परिवारात आता मी परत आलो आहे. तर राजू धिंगाण म्हणाले की, ‘आप’मध्ये आता कार्यकर्त्यांचा आदर नाही. कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून केवळ पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.