कोलकत्ता, १ सप्टेंबर २०२१: बंगालमध्ये भाजपला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी आणखी एक आमदार विश्वजित दास यांनी भाजप सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला. सोमवारी, विष्णुपूर सीटचे आमदार तन्मय घोष यांनी भाजप सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला.
बंगाल विधानसभा निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या भाजपकडे आता ७२ आमदार आहेत. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, बागडाचे भाजप आमदार विश्वजित दास यांनी दावा केला की आणखी २० आमदार भाजप सोडून टीएमसीमध्ये सामील होणार आहेत.
विश्वजित दास यांच्या मते, भाजप पक्षात कोणतीही कार्यसंस्कृती नाही. त्यांच्यात बरीच दुफळी आहे. दुसरीकडे, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी ज्या प्रकारे नेतृत्व देत आहेत आणि ममता बॅनर्जी यांचे नाव घरोघरी पोहचत आहे त्यावरून प्रेरित होऊन त्यांनी पुन्हा टीएमसीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
विश्वजीत दास यांनी असेही सांगितले की, बाहेरचे लोक जे बंगालीमध्ये बोलू शकत नाहीत ते येथे राज्य करू शकत नाहीत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विश्वजित दास यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि बागडा येथून निवडणूक लढवून ते विजयी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे