औरंगाबाद, ५ ऑक्टोंबर २०२०: कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर युपीएससीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. देशभरातील तब्बल दोन हजार पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवर या परीक्षांचं आयोजन केलं गेलं आहे. कोरोनामुळं या परीक्षांकडं विद्यार्थ्यांनी कानाडोळा केल्याचं निदर्शनास आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी परीक्षेसाठी तब्बल ५ हजार परीक्षार्थींनी दांडी मारली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाच हजार परिक्षार्थीं हे गैरहजर असल्याची माहिती समोर आलीय.
औरंगाबाद जिल्ह्यातून युपीएससीच्या परीक्षेसाठी ११,४२९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, कोरोनाचं संकट पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षांना येणं टाळलं. त्यामुळं यावेळी यूपीएससी’च्या परीक्षांसाठी केवळ ५,५७२ विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली. त्यामुळं कोरोनाचा मोठा फटका परीक्षेला बसल्याचं बोललं जात आहे.
याबरोबरच यंदाच्या एमपीएससी परीक्षांवर देखील संकटाचं सावट पसरलं आहे. मराठी क्रांती मोर्चा कडून एमपीएससी’ची परीक्षा पुढं ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील पाठवण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रवर्गात ठेवलं जाणार आहे याबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नाही. जोपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत एमपीएससी’च्या परीक्षा पुढं ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या आधी देखील एमपीएससी’ची परीक्षा पुढं ढकलली गेली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे