पुणे, लोणी काळभोर, दि. ४ मे २०२० : कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका लग्नांसह सर्व धार्मिक समारंभांना बसला आहे. साधारणत: तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. ते वर्षभर सुरू असतात. उन्हाळ्यात सर्वाधिक लग्न अगदी थाटात उरकण्यात येतात. यावर्षी काेरोनामुळे अनेक मंगल कार्यालय व्यवसाय धारकांना फटका बसला आहे. दिवाळीपर्यंत लग्नाची वाट पाहावी लागणार आहे.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सावरण्यास किमान दोन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे हवेली तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयांना चांगलाच फटका बसल्याचे सांगितले आहे. एका मंगल कार्यालयात एका सीझनमध्ये साधारणत: ६० ते ६५ लग्न होतात. ग्रामीण भागात ०१ ते ०३ लाखांपर्यंत लग्नाचे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये रोषणाई, केटरिंग, मंडप, भटजी, अक्षदा, वरात, बँडवाले, फोटो शूट व व्हिडिओ शूटिंग, वरपक्षाची सरबराई, अल्बम, लग्नानंतर वराकडच्यांना लाडू चिवड्याचे पॅकेट देणे, अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. वरपक्षाला फक्त घरून बॅगा घेऊन यावे लागते.
हवेली तालुका मंगल कार्यालय व्यावसायिकांची मंगल कार्यालय संघटना नसल्याचे सांगितले व मंगल कार्यालय व्यवसाय धारकांवर अनेक लोन चालू आहेत. तरी सरकारने मंगल कार्यालय धारकांना चार महिन्यांचे व्याज माफ करावे व मंगल कार्यालय व्यवसायिकांना सरकाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. लाॅकडाऊनमुळे १७ मे पर्यंत कोणताही कार्यक्रम घेता येत नाही. त्यानंतरही परिस्थिती सावरेल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
एका मंगल कार्यालयात सरासरी ६० लग्न लागतात व लग्न रद्द झाल्यामुळे वा पुढे ढकलल्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळ्यात मंगलकार्ये होत नाहीत. त्यामुळे दिवाळीशिवाय पर्याय नाही. लग्नाव्यतिरिक्त वर्षभर मुंज, साक्षगंध, वाढदिवस, कॉर्पोरेट सेक्टरचे कार्यक्रम चालतात. या व्यवसायांबरोबर अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. असे हवेली तालुका मंगल कार्यालय व्यवसायिकांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे