नवी दिल्ली, २१ ऑगस्ट २०२०: कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. मार्चपासून सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली. यादरम्यान सर्वच उद्योगधंदे कंपन्या बंद असल्या कारणाने कंपन्यांना देखील मोठे नुकसान झाले आहे परिणामी अनेक लोकांच्या नोकर्यांवर गदा आली आहे. अशा परिस्थितीत आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा ५० टक्के पगार दिला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे औद्योगिक कामगारांना दिलासा मिळणार आहे. पण ही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांनाच मिळणार आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच २४ मार्च ते ३१ डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या (९० दिवस) ५० टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असणार आहेत. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणं अनिवार्य आहे.
आधी करोनाचं संकट त्यानंतर पाठोपाठ आलेला लॉकडाउन याचा गंभीर परिणाम नोकऱ्यांवर झाला आहे. नोकरदार वर्गातील लोकांच्या नोकऱ्या जाणं ही बाब चिंता वाढवणारी आहे. CMIE ने दिलेल्या माहितीनुसार १ कोटी ७७ लाख लोकांच्या नोकऱ्या या एप्रिल २०२० या महिन्यात गेल्याची माहिती समोर आली आहे. तर १ लाख लोकांच्या नोकऱ्या या मे महिन्यात गेल्या आहे. जून महिन्यात ३९ लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र जुलै महिन्यात नोकऱ्या जाणाऱ्यांची संख्या ५० लाखांवर पोहचली.
न्यूज अनकट प्रतिनिधी