काबूलच्या ‘चायनीज हॉटेल’मध्ये मोठा स्फोट, गोळीबार करत घुसले हल्लेखोर, ३ ठार, १८ जखमी

काबूल, १३ डिसेंबर २०२२: अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये सोमवारी दुपारी स्फोट झाला. काबूलच्या शहर-ए-नवा भागातील हॉटेलला हल्लेखोरांनी लक्ष्य केलंय. या हॉटेलला चायनीज हॉटेल असे म्हणतात कारण चीनचे वरिष्ठ अधिकारी येथे वारंवार ये-जा करतात. आतापर्यंत, हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही, परंतु हॉटेलच्या परिसरातून मोठ्यानं बंदुकीच्या गोळ्या आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर गोळ्या झाडत हॉटेलमध्ये घुसले होते. एएफपी या वृत्तसंस्थेनं सांगितलं की, चिनी व्यापारी आणि अधिकारी अनेकदा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील त्या हॉटेलला भेट देतात. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर लोकांना आतमध्ये बंदी बनवण्याचा कट रचत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इमारतीतून आगीच्या ज्वाला कशा बाहेर पडत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे.

स्थानिक पत्रकारांनी दिली माहिती

स्थानिक मीडिया प्रतिनिधीने या हल्ल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘काबूल शहरात एका चिनी हॉटेलवर हल्ला झाला. हॉटेलमध्ये घुसलेल्या काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्थानिक मीडिया हाऊस टोलो न्यूजनुसार, सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी घटनास्थळाकडं जाणारे रस्ते रोखले आहेत.

विशेष म्हणजे भारतातही २६ नोव्हेंबर २००८ रोजी एके ४७ सह दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक इमारतींना लक्ष्य केलं होतं. आज ज्या प्रकारे हे हल्लेखोर हॉटेलमध्ये घुसले आहेत, त्याच पद्धतीनं २००८ मध्ये मुंबईतील हॉटेल ताजमध्येही दहशतवादी हातात बंदुका घेऊन घुसले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी लहान मुलांपासून ते वृद्ध आणि महिलांना लक्ष्य केलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा