गणिताचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान,मनसे आक्रमक, प्राचार्य धारेवर…

माढा, २१ डिसेंबर २०२०: माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील नगरपालिकेच्या महात्मा फुले विज्ञान महाविद्यालयात गणिताचा तास होत नसल्याने अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना धारेवर धरले. कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले.

महाविद्यालयात ११ वी व बारावीच्या प्रत्येकी चार तुकड्या आहेत. ११ वीचे एकूण ४०० तर बारावीचेही ४०० विद्यार्थी आहेत. अकरावीला गणित अनिवार्य आहे, बारावीच्या जवळपास २५० विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र ऐवजी गणित विषय निवडला आहे. २४ एप्रिल ही परिक्षेची तारीखही जाहीर झाली असून १५ डिसेंबर पासून फाॅर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. असे असताना गणिताचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

११ वी व बारावीच्या चार तुकड्यांसाठी गतवर्षी दोन शिक्षक कार्यरत होते. त्यातील एका शिक्षकाचे निधन झाल्याने महाविद्यालयातील गणिताच्या ज्ञानदानाचे कार्य विस्कळीत झाले आहे. परिक्षेला काही महिन्यांचा अवधी उरल्याने विद्यार्थ्यांनी अनेकदा प्राचार्य भोसले यांच्याकडे तात्पुरत्या शिक्षक नियुक्तीबाबत विनंती केली. पालकांनी जाब विचारल्यावर “शिक्षकाची आवश्यकता नाही, तात्पुरत्या शिक्षक नियुक्तीबाबत नगराध्यक्ष मुख्याधिकारी शिक्षण सभापती मंजूरी देत नाहीत” असे प्राचार्य भोसले सांगत होते. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे शिक्षकांचे तीन अर्ज आलेले असतानाही दुर्लक्ष करण्यात आले होते.

संतप्त झालेल्या दिडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य भोसले यांना चांगलेच धारेवर धरले. कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर भोसलेंची बोलती बंद झाली. शिक्षण सभापती हरिभाऊ बागल यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल सुर्वे, शहराध्यक्ष सागर बंदपट्टे, शहर संघटक आकाश लांडे, शहर उपाध्यक्ष गणेश चौधरी, शहर सरचिटणीस सोमनाथ पवार, सोमनाथ शिरगिरे, नागेश सादरे, बालाजी कदम उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा