नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२२: पेप्सी, कोका कोला आणि स्प्राईटसह इतर शीतपेय निर्मात्यांना कठीण स्पर्धा होणार आहे. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे मालक मुकेश अंबानी त्यांना ही स्पर्धा देणार आहेत. खरं तर, त्यांनी ७० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कॅम्पा कोलाला पुनरुज्जीवित करण्याची तयारी केली आहे.
२२ कोटींना घेतले विकत
आपल्या व्यवसायाचा विस्तार करत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता कोला मार्केटमध्ये दमदार एंट्री घेणार आहेत. यासाठी त्यांनी कॅम्पा कोला ब्रँड निवडला, जो ७० च्या दशकात या क्षेत्रात अव्वल होता. बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की रिलायन्सने कॅम्पा कोला ब्रँड दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक ग्रुपसोबत सुमारे २२ कोटी रुपयांना विकत घेतला आहे.
७० च्या दशकात कॅम्पा होती फेमस
१९४९ ते १९७० च्या दशकात मुंबईतील पेय निर्माता प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता. प्युअर ड्रिंक्सने स्वतःचा ब्रँड कॅम्पा कोला लाँच केला आणि कोका-कोला आणि पेप्सी देशाबाहेर गेल्यानंतर या क्षेत्रातील शीर्ष ब्रँड बनला. कंपनीने कॅम्पा ऑरेंज हे केशरी रंगाचे शीतपेय बाजारात आणून आपला व्यवसाय वाढवला. कॅम्पा कोलाचे ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ हे घोषवाक्य त्यावेळी खूप लोकप्रिय होते.
जोरदार पुनरागमनाची तयारी
१९९० च्या दशकात भारत सरकारने उदारीकरणाचे नियम लागू केल्यानंतर कंपनीचा व्यवसाय कमी होऊ लागला. यानंतर पेप्सिको आणि कोका-कोलाच्या एन्ट्री ने कॅम्पा कोलाला कमकुवत केले. पण आता पुन्हा एकदा कॅम्पा कोला या क्षेत्रात पुनरागमन करणार आहे, तेही देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्याच्या माध्यमातून. याच्या रिलाँचची जबाबदारी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सांभाळणार आहे. या क्षेत्रात अंबानींची थेट स्पर्धा कोका-कोला आणि पेप्सिकोशी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे