केंद्र सरकारकडून विमान प्रवास भाड्यात मोठी कपात, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

5

नवी दिल्ली, ८ जून २०२३ : हवाई प्रवास करणाऱ्या देशभरातील प्रवाशांना केंद्र सरकारने चांगलाच दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने विमान भाड्यात कपात केली आहे. यामुळे पुण्यासह अनेक मार्गावरचे भाडे कमी झाले आहे. हवाई नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. एअरलाइन्सच्या सल्लागार गटाच्या बैठकीनंतर दिल्लीपासून काही मार्गांवर विमान भाड्यात १४ ते ६१ टक्के कपात करण्यात आली आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्ली ते श्रीनगर, लेह, पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणचे भाडे कमी झाले आहे.विमान प्रवासाचे दर आणि इंधनांचे दर लवकरच कमी करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. विमान प्रवासाचे दर गगनाला भिडल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यामुळे सर्वच विमान कंपन्यांना दर कमी करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, ५ जून ते ६ जून रोजी दिल्ली-श्रीनगर मार्गासाठी तिकीट बुक करताना, विमान भाडे ११,९१३ ते १८,५९२ रुपये होते. परंतु ७ जूनला प्रवास करण्यासाठी ६ जूनला तिकीट बुक केल्यावर भाडे १०,६२६ ते १६५०६ रुपयांवर आले आहे. पूर्वी दिल्ली-लेहचे भाडे ८६५८ते २६,६४४ रुपये होते, जे ९७०७ ते १६,०३४ रुपयांपर्यंत खाली आले आहे. दिल्ली-पुणे, दिल्ली-अहमदाबाद मार्गाच्या भाड्यात कपात करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सिंधिया यांनी सांगितले की, खाजगी विमान कंपन्यांचीही स्वतःची सामाजिक जबाबदारी आहे. यामुळे विमान प्रवाशाचे भाडे वाढवण्याची मर्यादा असली पाहिजे. मंत्रालयाची भूमिका नियामकाची नसून सूत्रधाराची आहे.त्याचबरोबर केंद्र सरकार लवकरच देशवासीयांना दिलासा देणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहे. त्याचा फायदा देशवासीयांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही लवकरच उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा