काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा मोठा खुलासा… PoK मध्ये रचला कट, 200 लोकांची यादी होती तयार

काश्मिर, 3 जून 2022: काश्मिरी पंडितांवर आणि काश्मीरमध्ये बाहेरून काम करणाऱ्या लोकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. काही काळापासून हे हल्ले तीव्र झाले असून आता त्यावर मोठा खुलासा झाला आहे. गेल्या वर्षी पाकव्याप्त काश्मीरमध्ये या टार्गेट किलिंगचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यादरम्यान, अशा 200 लोकांची यादी तयार करण्यात आली होती, जे लोक टारगेटवर होते.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील टार्गेट किलिंगची योजना एक वर्षापूर्वी पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये करण्यात आली होती. 21 सप्टेंबर 2021 रोजी मुझफ्फराबाद, पीओके येथे आयएसआय अधिकारी आणि वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांमध्ये बैठक झाली.

नवीन नावांनी दहशतवादी गट तयार करण्याची योजना

यापूर्वीही याबद्दल खुलासा झाला होता. आयएसआयच्या दहशतवादी संघटनांसोबत झालेल्या या बैठकीत टार्गेट किलिंगची जबाबदारी घेणारे वेगवेगळ्या आणि नवीन नावांनी दहशतवादी गट तयार केले जातील, असा निर्णय घेण्यात आला.

काश्मिरी पंडित, सुरक्षा कर्मचारी, आरएसआर आणि भाजपचे स्थानिक नेते, केंद्र सरकारचे कर्मचारी यांना लक्ष्य करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आयएसआयने दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने टार्गेट किलिंगसाठी 200 लोकांची यादी तयार केली होती, ज्यांना लक्ष्य केले जाणार होते. आता वर्षभरानंतर आयएसआयच्या प्लॅनमुळे काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे.

26 दिवसांत 10 जणांचा मृत्यू

काश्मीरमधील परिस्थिती किती बिकट आहे याचा अंदाज या आकडेवारीवरून घ्या. गेल्या 26 दिवसांत दहशतवाद्यांनी 10 जणांना लक्ष्य केले आहे. त्यात एका महिला शाळेतील शिक्षिका, बँक व्यवस्थापकाचाही समावेश आहे. काल दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. यामध्ये प्रथम बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची बँकेतच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर दोन परप्रांतीय मजुरांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

रात्री उशिरापासून काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचारी खोऱ्यातून बाहेर पडू लागले. यातील बहुतांश लोक जम्मूमध्ये आले आहेत. बडगाममध्ये शेखपुरा पंडित कॉलनी आहे. राहुल भट्टचे (ज्याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती) येथे वास्तव्य होते. पूर्वी येथे 350 काश्मिरी पंडितांची कुटुंबे राहतात. मात्र आता दीडशे कुटुंब तेथून निघून गेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा