पुणेकरांसाठी मोठा झटका , पीएमपीएलच्या भाडेवाढीची शक्यता, एसटीच्या दरात आधीच वाढ

पुणे २९ जानेवारी २०२५ : पुणेकरांना आता प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार! आधीच एसटीच्या तिकिट दरात १४.९५% वाढ करण्यात आली असून, आता पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) भाडेवाढीच्या तयारीत आहे. वाढत्या इंधन दरांपासून ते कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीपर्यंतच्या कारणांमुळे पीएमपीचा आर्थिक ताण वाढला आहे. परिणामी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर प्रवास महागण्याची टांगती तलवार आहे.

पीएमपीचा तोटा कोटींमध्ये, भाडेवाढ अटळ?

२०१६-१७ च्या तुलनेत पीएमपीचा तूट ४९६.४४ कोटींनी वाढली आहे. २०२३-२४ मध्ये पीएमपीला ६६९ कोटींचे उत्पन्न मिळाले, मात्र खर्च तब्बल १,४६७ कोटी रुपयांवर गेला. म्हणजेच, महसुलापेक्षा खर्च प्रचंड वाढला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना हा भार पेलवणारा नसल्याने भाडेवाढ अपरिहार्य मानली जात आहे.

दररोज १२ लाख प्रवाशांना महागणार प्रवास!

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात १,७०० बस सेवा देतात, ज्यातून दररोज १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या खर्चाचा डोलारा वाढल्याने, लवकरच या प्रवाशांना तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागू शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

एसटीच्या भाडेवाढीचा फटका आधीच बसला!

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाड्यात १४.९५% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ जानेवारीपासून ही दरवाढ लागू झाली असून, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना जादा खर्च करावा लागत आहे.

आता पीएमपीएलची भाडेवाढ झाली तर पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार की नवा आर्थिक भार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे