कुपवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, पाच दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर १६ जून २०२३: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये, सुरक्षा दलाला पुन्हा एकदा मोठे यश मिळालय. येथे चकमकीत ५ दहशतवादी मारले गेले. कुपवाडामधील एलओसीच्या जुमागुंडा भागात ही चकमक सुरू आहे, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाईदरम्यान ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे जम्मू-काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना जवळ येताना पाहिल्यानंतर अचानक गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. या कारवाईत ठार झालेले पाच दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी या भागात आणखी दहशतवादी लपल्याची माहिती आहे, त्यांच्या शोधासाठी शोधमोहीम राबविण्यात येतेय.

यापूर्वी नुकतेच लष्कराने दहशतवादी आणि आयएसआयचा मोठा कट उघड केला होता. तपासादरम्यान असे आढळून आले की, दहशतवादी आणि आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे आणि संदेश पोहचवण्यासाठी महिलांचा उपयोग करत आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आलय. गुरुवारी लष्कराने पुंछमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा