बिहार, २८ ऑक्टोबर २०२०: बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. ७१ जागांसाठी ६ मंत्र्यांसह १ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. कोरोनाची साथ पसरल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.
कोरोनामुळे मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल मर्यादा १ हजार ६०० वरून १ हजार करण्यात आली आहे. तसेच मतदानकेंद्रात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे बंधनकारक आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर्स, साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात चुरस आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी संयुक्त जनता दल ३७ तर भाजपा २९ जागा लढत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाने ४२ ठिकाणी उमेदवार उभे केले असून त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस २० ठिकाणी लढत आहे. राष्ट्रीय जनता दल नेते लालू प्रसाद यादव अद्याप जेलमध्ये असल्यामुळे तेजस्वी यादव यांच्यावरच निवडणुकीची पूर्ण जबाबदारी असणार आहे. पाटणातील राजद मुख्यालयाबाहेरील पोस्टरवरून लालू प्रसाद यादव गायब आहेत. परंतु तेजस्वी यादव दिसत आहेत.
तर दुसरीकडे भाजप आणि नितीशकुमार यांची युती असल्याने या निवडणुकीत आरजेडीविरुध्द असा सामना रंगत आहे. निवडणूक प्रचारात दोन्ही विरोधकांनी जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेजस्वी यादव हे तरुण नेतृत्व दिग्गज नेत्यांना कशी टक्कर देतात, याचीही उत्सुकता आहे.
पहिल्या टप्प्यात २.१४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १.१ कोटी महिला आणि ५९९ तृतीयपंथी आहेत. दरम्यान कोरोना संकटात इतकी मोठी निवडणूक घेणारं बिहार पहिलं राज्य ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये जवळपास ७.२९ कोटी मतदार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे