कल्याण, २१ ऑगस्ट ,२०२०: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले अनेक दिवसांपासून कल्याण – डोंबिवली मधील रहिवासी हे त्यांच्या मुळगावी गेले होते. त्याचाच फायदा घेत कल्याण-डोंबिवलीत घरफोडी तसेच गाड्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे कल्याण-डोंबिवली मध्ये चोरांचा सूळसूळाट होता. कल्याण-डोंबिवली मध्ये हे चक्र सूरूच होते. मात्र याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये महागड्या गाड्या चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
महागड्या बाईक चोरीच्या गुन्ह्यात सराईत असणाऱ्या चोराला कल्याण अँटी रॉबरी सेलकडून अटक करण्यात आली आहे. हैदर अक्रम इराणी असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून ८ बाईकही हस्तगत करण्यात आल्या आहेत. आंबिवली स्टेशननजीक असलेल्या इराणी वस्तीमध्ये हा हैदर अक्रम इराणी राहतो. ६ ऑगस्ट रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदर अक्रम इराणी विरूद्ध कल्याण, डोंबिवली, टिटवाला, उल्हासनगर अशा अनेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी अँटी रॉबरी स्कॉडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे आणि त्यांचे पथक हैदरच्या शोधात होते. आंबिवलीच्या इराणी वस्तीत हैदर येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्यांनी हैदरला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीमध्ये त्याच्याकडून 4 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाक्या आणि 1 मोबाईल इत्यादी सामान जप्त करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे