नवी दिल्ली २४ जून २०२३: केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना,आधारशी जोडलेल्या बायोमेट्रिक प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्याची प्रणाली अनिवार्य करण्यास सांगितले आहे. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हजेरीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीनंतर सरकारने हे निर्देश दिले. आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम, केंद्र सरकारची मंत्रालये त्यांचे संलग्न विभाग आणि सरकारी संस्थांच्या कार्यालयांमध्ये जोडण्यात आली आहे.
ज्या कार्यालयांमध्ये ही मशिन बसवण्यात आली आहे त्याच कार्यालयात कर्मचारी हजेरी नोंदवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. त्यामुळे कार्मिक मंत्रालयाने नव्याने आदेश जारी करण्याचे ठरवले असुन, यापुढे हजेरी लावण्यात होणारा हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या पत्राद्वारे, बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती अनिवार्यपणे करण्यास सांगितले आहे.
हजेरीची ही प्रणाली सर्व मंत्रालये आणि विभागांच्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य असुन, बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवण्याच्या यंत्रणेचे काटेकोर पालन करण्याची आणि त्याची खातरजमा करण्यासाठी विभागप्रमुखांना सांगण्यात आले. कार्यालयात उशिरा येणाऱ्या आणि लवकर जाणाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर