जालोर, राजस्थान १८ जून २०२३: गुजरातमध्ये कहर केल्यानंतर, चक्रीवादळ बिपरजॉय आता शेजारच्या राज्यात राजस्थानमध्ये आपले रंग दाखवत आहे. शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. बिपरजॉयचा विशेष प्रभाव गुजरातला लागून असलेल्या नैऋत्य भागात दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार आजही अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल.
जालोरमध्ये वादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर जिल्ह्यातील अनेक भागात विद्युत खांब तुटले. त्यामुळे विजेचीही समस्या निर्माण झाली आहे. येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भीनमाळ, राणीवाडा, सांचोरे, जसवंतपुरा परिसरातील अनेक नदी नाले तुंबले आहेत. अनेक मार्गही ठप्प झाले. याशिवाय सुकडी नदीतही पाण्याची आवक सुरू आहे.
भिनमाळ शहरातील अनेक भागात पाणी तुंबले असुन येथे मुसळधार पावसामुळे सुंधा मातेच्या परिसरातील नदी नालेही भरले आहेत. वनधार धरणही ओव्हरफ्लो झालय. येथे चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येतय, अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी निशांत जैन आणि एसपी मोनिका सेन यांच्याकडून गावांपासून ते जिल्हा मुख्यालयापर्यंत सतत देखरेख ठेवली जात आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे धरण, नदी, नाल्यांमध्ये पाण्याची आवक वाढतेय, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना प्रशासनाकडून हलवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे पडलेल्या झाडातील विद्युत खांब हटवण्यात आपत्ती व मदत पथके गुंतली आहेत. जालोर आणि सांचोर जिल्हा गुजरातला लागून असल्याने येथे चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, सततच्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड