‘अरे खोप्यामधे खोपा’ या बहिणाबाईंच्या कवितेतील सुगरण हा पक्षी प्रत्यक्ष जीवनातही सुगरण म्हणजे आदर्श कुटुंबवत्सल असतो. हा पक्षी त्याच्या खोप्यासारखी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. पिवळ्या, तपकिरी, राखाडी रंगातील सुगरण पक्षी शक्यतो पाण्याच्या खूप जवळ आपल सुंदर घरटं बांधतो म्हणजेच विणतो. शेतकरी शेतातील वस्तीवर राहण्यासाठी खोपी म्हणजे लहान झोपडी बांधतात, तसाच आकार सुगरणच्या घरट्याचा असल्याने त्याला सुगरणीचा खोपा असं म्हणतात. नदी, तलाव, पाणवठे, विहिरींच्या काठावर तसेच एखाद्या बाभळीच्या झाडावर सुगरण पक्ष्यांची अनेक सुबक घरटी लटकताना दिसतात.
सुगरण ‘प्लोसीइडी’ या कुलातील एक पक्षी असुन याच्या दोन-तीन जातींपैकी प्लोसियस फिलिप्पिनस ही जाती भारतात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने भारतात सुगरणीच्या आढळणाऱ्या दोन जाती आहेत. एक म्हणजे रेषांची सुगरण. हिचे शास्त्रीय नाव प्लो. मान्यार असे आहे. या सुगरणीच्या नराची छाती तांबूस असून पाठीवर काळ्या रेषा असतात. डोक्यावर चकाकणारा पिवळ्या रंगाचा तुरा असतो. दुसरी जात म्हणजे काळ्या गळ्याची सुगरण. हिचे शास्त्रीय नाव प्लो. बेंघॅलेन्सिस असे आहे. या जातीतील नराचा तुरा सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो. गळा पांढरा असून छाती काळ्या रंगाची असते. नर व मादी या दोघांचाही रंग पिवळा, पिंगट-तपकिरी असून चोच जाड व निमुळती असते. उन्हाळ्यात व विणीच्या हंगामात नराचे डोके पिवळे, पाठीवर पिवळ्या-तपकिरी रेषा, छातीचा भाग पिवळा तर उर्वरित भाग फिकट पांढरा होतो.
मे ते सप्टेंबर हा सुगरणच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे आवाज काढतो. मादी आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहते. घरटे पसंत पडल्यावरच त्या नराशी मादीचे मीलन होते. मग मादी उर्वरित घरटे पूर्ण करते. नर सुगरण एकावेळी एकापेक्षा जास्त मादींची सोबत करतो. एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलाविण्यासाठी परत आवाज काढतो. अर्धवट तयार झालेले घरटे कोणत्याही मादीने पसंत केले नाही, तर नर ते पुरे करीत नाही. अशी अपुरी घरटी बऱ्याच ठिकाणी आढळतात.
सुगरण पक्ष्याच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. हे घरटे गवत पानांच्या रेशा, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते.
सुगरण पक्ष्यांचे थवे कापणी झालेल्या शेतात आणि शेतीभोवतालच्या प्रदेशांत नेहमी आढळतात. तलावांच्या काठावरील झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या झाडीत हे रात्री विश्रांती घेतात. धान्य आणि किडे यांचे मुख्य भक्ष्य आहे. यांचा आवाज चिमणीसारखाच चिवचिव असा असतो. सुगरण पक्षी भारत, पाकिस्तान,श्रीलंका,बांगलादेश,म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी याच्या काही उपजाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. भात शेतीच्या प्रदेशात थव्याने राहणारा सुगरण, उभ्या पिकावर चरायला येतात, कीटक आणि धान्य खातात. हजारोंच्या संख्येने सुगरण पक्ष्यांचा थवा आकाशात भिरभिरत असतो तेंव्हा सूर्य सुद्धा झाकोळून जातो. संध्याकाळी यांच्या वस्तीवर प्रचंड चीवचीवाट असतो.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.