पक्षीविश्व : ऑस्प्रे (Ospray)

ऑस्प्रे हा ससाणा, गरुड, घार व गिधाड या पक्ष्यांशी जवळचा संबंध असणारा पक्षी आहे. हा पक्षी अंटार्क्टिका वगळता जगामध्ये सर्वत्र आढळत असून तो स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा मुख्यत्वे नदी, तळी, सरोवर, समुद्र तसेच मोठ्या पाणीसाठ्याजवळ (गोड्या व खाऱ्या) आढळतो. मराठीत याला काही ठिकाणी मोरघार म्हणत असुन इंग्रजीमध्ये ऑस्प्रे (Ospray), सी हॉक (Sea hawk), फिश हॉक (Fish hawk) व रिव्हर हॉक (River hawk) अशी प्रदेशानुसार नावे आहेत. या पक्ष्यांची संख्या उष्ण प्रदेशीय भागांत स्थिर असून तेथून ते सहसा स्थलांतर करत नाहीत. काही पक्षी हिवाळ्यात यूरोपमधून आफ्रिकेत तसेच उत्तर अमेरिकेतून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. दक्षिण आशियात म्यानमार, दक्षिण-पूर्व आशिया, इंडोचीन आणि दक्षिण चीन, इंडोनेशिया, मलेशिया व फिलिपीन्स येथे हिवाळ्यात पाहुणा म्हणून हा पक्षी आढळून येतो.

ऑस्प्रे किंवा मोरघार हा आकाराने मोठा पक्षी असून त्याची लांबी दोन फूट व वजन एक ते सव्वा किलो असते. मादी नरापेक्षा मोठी असून तिचे वजन दोन किलोपर्यंत असते. शरीराची वरची बाजू गर्द तपकिरी काळपट आणि खालची बाजू पांढरी असते. डोके पांढरे व डोळ्याच्या दोन्ही बाजूंवरून मानेपर्यंत काळा पट्टा असतो. डोळे नारिंगी लाल ते गडद तपकिरी किंवा सोनेरी पिवळे असतात. नजर तीक्ष्ण असून उंचावरून भक्ष्य शोधण्याकरिता तिचा उपयोग होतो. चोच काळी, बळकट असते. पंख लांब असून पिसे पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी तेलकट असतात. पंखाचा विस्तार चार ते सहा फुटापर्यंत असतो. पाय पांढरे असून पायाच्या बोटांवर काळे, लांब व आतल्या बाजूने वळलेले अणकुचीदार नखे असतात. मादीमध्ये छातीवर गडद तपकिरी ठिपके, तर नरामध्ये ते फिकट असतात. ऑस्प्रे डोक्यावरून उडताना इंग्रजी एम् (m) या अक्षराप्रमाणे दिसतात. ऑस्प्रे एका तासात पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर पार करू शकतो.

ऑस्प्रेच्या विणीचा हंगाम त्यांच्या वास्तव्याच्या प्रदेशांनुसार बदलतो. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी नर हवेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कलाबाजी करतो. नर व मादी मिळुन शक्यतो पाण्याजवळ उंच ठिकाणी, मोठ्या झाडावर, विजेच्या खांबांबर काटक्यांपासून घरटी बांधतात. ते एकच घरटे वर्षानुवर्षे दुरुस्त करून वापरतात. मादी एका हंगामात १ ते ४ अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे चट्टे असतात. नर व मादी मिळून अंड्यांची काळजी घेतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते, तर नर त्याकाळात मादीसाठी अन्न आणण्याचे व घरट्याचे संरक्षण करण्याचे काम करतो. अंड्यातून बाहेर पडल्यावर, दोन महिन्यांनंतर पिल्लू हवेत पहिले उड्डाण घेते आणि आपले स्वतंत्र जीवन जगू लागते. ३ वर्षांचे झाल्यावर ते प्रजननक्षम होते. नर-मादी जोडा आयुष्यभर टिकतो.

ऑस्प्रे हा पक्षी मुख्यतः मत्स्याहारी(मासे खाणारा) असून मासे उपलब्ध न झाल्यास लहान सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणीही तो खातो. तो नदीकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर अधिक प्रमाणात आढळतो. संथ पाण्यावरून उडत हा पक्षी, पन्नास फूट उंचीवरून पाण्यात सूर मारून पायांनी मासा पकडतो व लगेच पाण्याबाहेर पडतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या पक्ष्याची आयुमर्यादा २०–२५ वर्षे आहे.

या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गातील ॲसिपिट्रीफॉर्मीस (Accipitriformes) गणामधील पँडिऑनिडी (Pandionidae) कुलामध्ये होतो. या कुलातील ही एकमेव प्रजाती असून तिचे शास्त्रीय नाव पँडिऑन हॅलिईटस  (Pandion haliaetus) आहे. भारतात हा पक्षी तसा दुर्मिळ असुन, ही प्रजाती संपण्याच्या धोकादायक कॅटेगरी मध्ये समाविष्ट आहे. भारतीय वन्य-जीव संरक्षण कायद्यानुसार या पक्षाला सुचिबद्ध करून विशेष संरक्षण देण्यात आलंय.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा