पक्षिविश्व- सारस

सारस चे शास्त्रीय नाव ग्रुस अँटिगोन असे आहे. उत्तर व मध्य भारत, थायलंड, म्यानमार इ. प्रदेशांत हा आढळतो. मैदानी प्रदेशात, पाण्याच्या आसपास, तलाव व तळी यांच्या काठावर, दलदलीच्या जागी किंवा शेतात हा राहतो. सारस पक्षी हा धान्य, किडे खाऊन जगतो. त्यातही किडे, अळ्या खाण्यावर भर असतो. त्यामुळे त्याला शेतातला ‘नॅचरल पेस्ट कंट्रोलर’ असं म्हटलं जातं. सारस शेतामध्ये असणं शेत उत्तम स्थितीत असल्याचा संकेत मानला जातो. सारस पक्षी झाडावर बसत नाहीत. ते नेहमी जमिनीवरच भटकत असतात. झाडाझुडपांचे कोवळे कोंब, वनस्पतिजन्य पदार्थ, किडे, सरडे, गोगलगायी इ. यांचे भक्ष्य आहेत.

सारस हा उंचीला सर्वात मोठा पक्षी आहे. तो गिधाडापेक्षाही मोठा आहे. याचे मान व पाय बरेच लांब असतात. शरीर पूर्ण पांढरे,राखाडी रंगाचे आणि डोक, मानेचा वरचा भाग लालभडक असतो. पाय लाल व पिसेविरहित असतात. मादी नरापेक्षा लहान असते. नर सारस सुमारे पाच फुटांचा तर मादी तीन ते चार फुटांपर्यंत उंच असते. सारस पक्षी आयुष्यभर जोडीनेच राहातात. प्रजोत्पादनाच्या काळात या पक्ष्यांचे प्रणयनृत्य प्रेक्षणीय असते ते खाली मान वाकवून एकमेकांना अभिवादन करतात पंख अर्धवट उघडून उड्या मारतात किंवा ते पसरून ठुमकत चालतात एकमेकांभोवती फेऱ्याही घालतात. ते मोठ्याने तुतारीसारखा आवाज काढीत नाच करतात.

जुलै ते ऑक्टोबर (म्हणजे पावसाळा) हा त्यांचा भारतातील विणीचा काळ. भात खाचरांमध्ये अथवा दलदलीमध्ये सारस मोठ्या आकाराचे घरटे बांधतो. यासाठी ते पाणवनस्पतीच्या आणि इतर वनस्पतीच्या काटक्या वापरतात. सुमारे मीटरभर उंचीचे आणि रुंदीचे हे घरटे असते. एक जोडी हेच घरटे दुरुस्ती करून अनेक वर्ष वापरताना दिसून आले आहे. सारस मादी एक किंवा दोन आणि क्वचित प्रसंगी तीन किंवा चार अंडी घालतात. त्यांना उबविण्याचा कालावधी हा ३४ दिवसांचा असतो. नर आणि मादी दोघेही अंडी उबविण्याचे काम चार ते पाच आठवड्यापर्यंत करतात. सुमारे तीन महिन्याचे होईपर्यंत पिल्ले आपल्या जन्मदात्यासमेतच राहतात. सारसाच्या घरट्याला, अंड्याला, पिल्लाना अनेक क्षत्रू असल्याने त्यांचा मृत्युदर जास्त आहे.

शेतात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळेही विषबाधेने सारसांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. याचबरोबर उच्चदाबाच्या वीज वाहक तारांना धडकुनही हे पक्षी दगावल्याची नोंदी आहेत. भारतामध्ये सारसांची संख्या १५,००० च्या आसपास असून नैसर्गीक पाणथळीच्या ठिकाणी त्यांची संख्या अधिक असल्याचेही नोंदवण्यात आले आहे. ‘आय यू सी एन, रेड डेटा बूक’ नुसार सारस पक्षांची नोंद ‘संवेदनशील प्रजाती’ म्ह्णून करण्यात आली आहे आणि जागतिक पातळीवर ही प्रजात ‘संकटग्रस्त’ म्ह्णून घोषित आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार शेड्युल चार अंतर्गत सारसचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडीकडे पाहून पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली. हे पक्षी आयुष्य एकाच जोडीदारबरोबर व्यतीत करीत असल्याने तसेच विणीच्या हंगामात जोडी अत्यंत मोहक असा प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतिक मानतात. राजस्थानमध्ये या पक्ष्याचे स्थान अतिशय मानाचे असल्याने याची शिकार करत नाही. असे मानतात की या पक्ष्याची शिकार केली तर त्याचा अथवा तिचा जोडीदार झुरून प्राण त्यागतो त्यामुळे याच्या शिकारीचे पाप अत्यंत मोठे आहे.

महाराष्ट्रातील विदर्भात सारस आढळतो. भंडारा,गोंदिया,चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सारस ची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सारस पक्षी महाराष्ट्रातून पूर्ण नामशेष होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु एकत्रित प्रयत्नांमुळे ही स्थिती बदलण्यात गोंदियाच्या लोकांना यश आलं. महाराष्ट्रातील सारसचा अधिवास असणाऱ्या गोंदिया, भंडारा, बालाघाट या प्रदेशाला ‘सारस-स्केप’ असं नाव देण्यात आलंय.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा