कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी जाहीर

पुणे , ४ फेब्रुवारी २०२३ :पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोट निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर आता भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून कसब्यातून हेमंत नारायण रासने यांना तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे.

हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक होते इच्छुक होते.

भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या निवडणूकीत उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही निवडणुक रंगतदार होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा